मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

पहिला मराठी महिना - चैत्र

चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपलं  मराठी नवं वर्ष सुरु होतं. इंग्रजी वर्ष थाटामाटात साजरं  करणारे आपण मात्र आपल्याच नववर्षा बद्दल अनभिज्ञ असतो. आपलं हजारो वर्षांपासून अव्याहतपणे कालगणना करणारं कॅलेंडर, त्याची  शास्त्रशुद्धता,  याबद्दल आपल्याला अजिबात माहिती नसते व ती करून घ्यायची फारशी इच्छाही नसते. नववर्षाच्या शुभेच्छांसह, आजचा हा  प्रपंच याची थोडक्यात ओळख करून देण्यासाठीचा.

आपली कालमापन पद्धती अत्यंत प्राचीन असून इतर संस्कृतींना कदाचित माहित नसाव्यात अशा गोष्टींचे उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. अजूनही रूढ असलेले मराठी महिने, हि आपली गेल्या सुमारे ५००० वर्षांपेक्षा जुनी  कालदर्शनाची पद्धत. मात्र यात कोणत्याही एका शकाचा किंवा घटनेचा प्रारंभबिंदू म्हणून उल्लेख सापडत नाही. त्याचबरोबर आपली कालमापनाची पद्धत चंद्राच्या कलांशी निगडित होती व म्हणूनच आपले महिने चंद्राच्या कलांशी जोडलेले आहेत. असे असले तरी त्याची सांगड सण  व ऋतु यांच्याशी घालण्याकरिता अधिक मास पद्धतीचा अवलंब करून आपण त्याचं  नातं सौर वर्षाशी देखील  जोडलं आहे. आतादेखील आपले कॅलेंडर चांद्र-सौर अथवा Lunisolar प्रकारचे आहे व अगदी अचूक देखील आहे. 

चंद्र आणि सूर्य आकाशातील एका ठराविक मार्गावरून भ्रमण करतात हे आपल्या पूर्वजांचे निरीक्षण होते. व या मार्गाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या ताऱ्यांचे आकार ठरवून , त्यांचे २७ विभाग करून , या तारका समूहांना नावे देण्याचे काम, पाश्चात्यांच्या फार पूर्वीच करण्यात आले होते. व म्हणूनच किमान ५००० वर्षांपूर्वीचा इतिहास असे मानल्या गेलेल्या महाभारतात आपल्याला ज्योतिःशास्त्राशी (जोतिष नव्हे) संबंध जोडता येईल असे किमान ३०० श्लोक आढळतात. यातील तारका, नक्षत्रं  व ग्रहांच्या स्थितीच्या वर्णनावरून महाभारताची कालनिश्चिती करण्याची चढाओढ बऱ्याच खगोल अभ्यासकांमध्ये व संशोधकांमध्ये लागलेली आहे. 

राशी हि मात्र पूर्णपणे पाश्चात्य संकल्पना आहे. आजच्या व्यवहारात आपण राशी हि संकल्पना वापरत असलो तरीदेखील मराठी महिने मात्र नक्षत्र संकल्पनेवर ठरतात. कसे ते आता आपण थोडक्यात पाहू.

मराठी नक्षत्रे 
आयनिक वृत्तावरील (चंद्र व सूर्य यांच्या भ्रमणमार्गाच्या पार्श्वभूमीवरील तारकामार्ग) मार्गात असलेले २७ तारकासमूह नक्षत्र या संज्ञेने ओळखले जातात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

(१) अश्विनी 

(८) पुष्य 

(१५) स्वाती

(२२) श्रवण 

(२) भरणी 

(९) आश्लेषा 

(१६) विशाखा

(२३) धनिष्ठा 

(३) कृत्तिका

(१०) मघा 

(१७) अनुराधा

(२४) शततारका

(४) रोहिणी

(११) पूर्वाफाल्गुनी 

(१८) जेष्ठा

(२५) पूर्वाभाद्रपदा

(५) मृगशीर्ष

(१२) उत्तरा फाल्गुनी

(१९) मूळ

(२६) उत्तराभाद्रपदा 

(६) आर्द्रा 

(१३)हस्त

(२०) पूर्वाषाढा

(२७) रेवती

(७) पुनर्वसू 

(१४) चित्रा

(२१) उत्तराषाढा



यातील पौर्णिमेचा चंद्र ज्यावेळी ज्या महिन्यात ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचे नाव त्या महिन्याला देण्यात येते.म्हणजेच गुढी पाडवा ज्या चैत्र महिन्यात येतो त्या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र चित्रा या नक्षत्राच्या जवळ असेल व ते दृश्य असे दिसेल. 
चैत्र पौर्णिमा - चित्रा नक्षत्राजवळ चंद्र
हा महिना प्रतिपदेपासून सुरु होतो. म्हणजेच १५ दिवस आधी झालेल्या अमावास्येला चंद्र व सूर्य हे पृथ्वीच्या एकाच बाजूला म्हणजेच एकाच नक्षत्रात असतील. या दिवशीची हि रास, चित्रा नक्षत्र ज्या राशीत आहे त्या कन्या  राशीच्या साधारणपणे १८० अंश असेल.  म्हणजेच सूर्य अश्विनी नक्षत्रात अथवा मेष या राशीत असल्याचे आपल्या लक्षात येईल. सोबतच्या चित्रात दर्शविलेल्या रचनेवरून हे अधिक स्पष्ट होईल. 

म्हणजेच चैत्र या आपल्या पहिल्या महिन्यातच सूर्याचे मीन या शेवटच्या राशीतून मेष या प्रथम राशीत संक्रमण होत असते हे  आपल्या लक्षात येईल. 

याच क्रमाने आपण पुढे गेलो तर आपल्याला चैत्र नंतर वैशाख (विशाखा) , जेष्ठ (जेष्ठा), आषाढ (पूर्वाषाढा-उत्तराषाढा), श्रावण (श्रवण), भाद्रपद (पूर्वा व उत्तराभाद्रपदा) , आश्विन (अश्विनी) , कार्तिक (कृत्तिका) , मार्गशीर्ष (मृगशीर्ष), पौष (पुष्य), माघ (मघा) व फाल्गुन (पूर्वा व उत्तरा फाल्गुनी) असे १२ महिने मिळतात. कंसात दर्शविलेली नक्षत्रांची नावे त्या महिन्याच्या पौर्णिमेचा चंद्र साधारणपणे कोणत्या नक्षत्राजवळ असतो ते दर्शविण्यासाठी आहेत. 

अशावेळी आकाश निरीक्षणासाठी आपल्याला काय सोईचे ठरेल ? सूर्य ज्या राशीत प्रवेशतो ती रास तर आपल्याला निश्चितच पाहता येणार नाही,  मात्र त्याचवेळी १८० अंशावर असणारी रास (अथवा ते नक्षत्र ) आपल्याला निश्चितच छानपणे आपल्याला अगदी डोक्यावर पण दिसू शकेल. आणि मग ते ओळखाल कसे ?

यासाठी आपण या नक्षत्रांचे आकार हळू हळू जाणून घेऊ. काही गोष्टींचा उपयोग करून ते लक्षात ठेवू व त्यांच्या आजूबाजूचे तारकासमूहांचे आकार पण त्यांच्या गोष्टीत गुंफून जोडू म्हणजे हळूहळू सर्व आकाश आपल्या कह्यात येऊ लागेल. 

तसेच चांद्र वर्ष व सौर वर्ष याचा मेळ कसा घातला जातो हेदेखील वेगळ्या लेखातून आपण पाहू.

६ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद.

Jaywant Joshi म्हणाले...

अतिशय सुंदर माहिती... खूप खूप धन्यवाद.मराठी पंचांगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलून जातो.

CK म्हणाले...

खुपच सुंदर माहिती, धन्यवाद महेश..

Gopal salunkhe म्हणाले...

खूप छान माहिती पुढील लेखाची आतुरता..

Madhusudan Mulik म्हणाले...

खूपचं छान आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने सांगितले आहे तरीही थोडा अभ्यास करावा लागेल.

विकास पोवार म्हणाले...

मला सर्व काही कळलं असं मी म्हणणार नाही. कारण आता पर्यंत या विषयाचा कधी अभ्यासच केला नाहीये. पण असं काही आहे हे लक्षात आलं हे ही काही कमी नाही.