शुक्रवार, १४ मे, २०२१

शून्य सावलीचे दोन दिवस

१५ मे व २८ जुलै हे मुंबईसाठीचे शून्य सावलीचे दोन दिवस. त्या निमीत्ताने शून्य सावलीची माहिती देणारा हा लेख  

शून्य सावली ? म्हणजे नक्की काय ? व ती असते तरी कधी असा प्रश्न कधी आपल्याला पडलाय का ? पडला असो अथवा नसो, याची माहिती जाणून घ्यायला काय हरकत आहे ?

आपल्याला माहीत आहेच कि पृथीचा अक्ष सूर्यसापेक्ष २३-१/२ अंश कललेला आहे. याचमुळे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमण मार्गातील घटना आपल्याला पाहायला मिळतात. ऋतू हि त्यातीलच एक घटना. त्याचबरोबर या कलामुळे आपल्याला सूर्य रोज वेगवेगळ्या वेळी उगवताना व मावळताना दिसतो. 

सूर्य वर्षभरात कर्कवृत्त व मकरवृत्त या दोन काल्पनिक रेखावृत्ताच्या मध्ये घुटमळत असतो. त्यामुळे या दोन रेखावृत्तांच्या मधील प्रदेशातील लोकांच्या तो कधी ना कधी डोक्यावर येतो. वर्षातील २ दिवस असे घडते व त्यामुळे वर्षातील या दोन दिवसात सूर्य डोक्यावर असताना तुमची सावली पडत नाही अथवा शून्य होऊन जाते व या २ दिवसानाच तुमचे (त्या स्थानाचे) शून्य सावलीचे दिवस म्हटले जाते.  तुम्ही ज्या अक्षांशावर राहता त्यावर हे स्थान बदलत जाते. पण जर तुम्ही २३-१/२ अंशाच्या पलीकडे उत्तरेकडे अथवा दक्षिणेकडे गेलात तर सूर्य तुमच्या बरोबर माथ्यावर कधीच येणार नाही व प्रत्येक वेळी तुम्हांला सूर्याची सावली पाहायला मिळेल. आपण आता आकृतीच्या साहाय्याने हि घटना समजावून घेऊ व महाराष्ट्रात असे शून्य सावलीचे दिवस कुठे व कधी असतात हे देखील पाहू.

पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेतील भ्रमणमार्गावर आपल्याला या कलाच्या परिणामामुळे दिसणारे काही ठळक काल्पनिक बिंदू दाखवता येतात ते म्हणजे सूर्याचा उत्तरेकडे प्रवास सुरु होतो तो दिवस उत्तरायण बिंदू (Winter Solstice )  म्हणून दर्शविता येतो. २१ डिसेंबरच्या या दिवशी सूर्य आपला दक्षिण गोलार्धाच्या त्याच्या अंतिम बिंदुला स्पर्श करून मागे वळतो व उत्तरेच्या बाजूने आपला प्रवास सुरु करतो. यानंतर पृथ्वी लगेचच आपल्या लंबगोल कक्षेतील सूर्याच्या सर्वात जवळच्या बिंदूपाशी म्हणजे उपसूर्यस्थानी  (३ जानेवारी) येते. पुढे २१ मार्चला सूर्य आपल्याला विषुववृत्तावर आलेला दिसतो या बिंदुला आपण शरद संपात (Autumnal Equinox ) बिंदू म्हणून ओळखतो. 

यापुढे सूर्याचा प्रवास उत्तर गोलार्धात सुरु होतो व तो २१ जुन पर्यंत सुरु राहतो. हा आपला दक्षिणायन बिंदू (Summer Solstice ). या ठिकाणी सूर्य पुन्हा २३-१/२ अंश उत्तरेकडे आलेला असतो व आपला दक्षिणेकडचा प्रवास सुरु करतो. ३ जुलैच्या सुमारास पृथ्वी सूर्याच्या कक्षेतील दूरच्या बिंदूपाशी म्हणजे अपसूर्यस्थानी असते.  २३ सप्टेंबरला वसंत संपात (Vernal Equinox ) या विषुववृत्तीय बिंदूपाशी येऊन सूर्य आपला दक्षिण गोलार्धातील प्रवास सुरु करतो. 

या सर्व प्रवासात सूर्यकिरणांचा  पृथ्वीवरील येणारा कोन बदलत राहतो व सूर्य आपल्यासापेक्ष कोणत्या ठिकाणी उगवतो ते ठिकाण देखील. उन्हाळ्याच्या दिवसात सूर्य उत्तर गोलार्धात असतो म्हणून तो उत्तरेकडे उगवतो दोनवेळा जेव्हा तो विषुववृत्तीय बिंदूपाशी येतो तेव्हा तो बरोबर पूर्वेकडे व दक्षिणेकडे जाताना आपल्याही दक्षिण बाजूला उगवताना दिसतो. जर आपण एकाच ठिकाणी उभे राहिलो तर आपल्याला दरदिवशीचा सूर्योदय वेगवेगळ्या ठिकाणी झालेला दिसेल.


मुंबईवरील शून्य छायेची स्थिती - १५ मे
या सर्व प्रवासात एखाद्या अक्षांशावर राहणाऱ्या व्यक्तीच्या तो २ वेळा डोक्यावर येईल (फक्त +/- २३-१/२ अंशाच्या मध्ये राहणाऱ्यांच्या). या वेळा गणिताच्या साहायाने ठरविता बरोबर ठरवता येऊ) भारतातला बराच भाग व महाराष्ट्रातील सर्व भाग यात येत असल्याने या लेखासोबत महाराष्ट्रात या घडण्याचे दोन दिवस सोनाच्या चित्रात दाखविले आहेत. मुंबईसाठी हे दोन दिवस १५ मे  व २८ जुलै असे आहेत. मुंबईच्या दक्षिणेकडे असलेल्या कोकण, पुणे या भागांसाठी यातील एक दिवस आधी तर एक दिवस नंतर यतो पण हा नंतरचा दिवस पावसाळ्यातील असल्याने आपल्याला सावली लक्षात येत नाही. 
या दोन दिवशी जेव्हा दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येईल तेव्हा आपली सावली पडणार नाही. इतर दिवशी मात्र कोणत्याही वेळी आपली सावली पडल्याचे आपल्याला आढळून येईल. 
संदर्भ : 
  1. https://astron-soc.in/outreach/activities/zero-shadow-day/
  2. https://drajmarsh.bitbucket.io/sunpath2d.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: