रविवार, ७ मार्च, २०२१

१७६१ ची मकरसंक्रांत.... १० जानेवारीला


 मकरसंक्रांत म्हणजे उत्तरायण नाही

#makarsankranti, #panipat, #precession #uttarayan

मकरसंक्रांत उजाडली कि त्याबरोबर जसे शुभेच्छांचे मेसेज येऊ लागतात त्याचप्रमाणे १४ जानेवारी १७६१ च्या पानिपत युद्धाचे देखील. पानिपतचे युद्ध हे मराठ्यांच्या पराक्रमाचा एक अत्त्युच्च बिंदू मनाला जातो व लौकिक अर्थाने जरी हि त्या दिवशीची हार असली तरी काळाच्या ओघात तो मराठ्यांचा एक मोठा विजय मानला जातो.

या युद्धाबरोबर क्वचित कधीतरी संक्रांतीच्या दिवसाचा उल्लेख असतो. १४ जानेवारी म्हणजे संक्रांत हे समीकरण साधारणपणे सध्याच्या काळात काहीसे बरोबर असले तरी ते घट्ट समीकरण नाही, या तारखेत देखील कालौघात बदल घडत आहेत व या बदलांमुळेच मकर संक्रमण हळू हळू पुढे सरकत आहे. त्याचमुळे जर  आपण जर २६० वर्षे मागे म्हणजे १७६१ सालात गेलो तर आपल्याला संक्रात १० जानेवारीला आली होती असे आढळेल 

हे असे बदल का घडतात हे समजण्यासाठी थोडेसे खगोलशास्त्र जाणून घेणे आवश्यक आहे. बरेचदा मकर संक्रांति म्हणजेच उत्तरायण असे मानले जाते जे बरोबर नाही. कोणे एके काळी सूर्याचे उत्तरायण (उत्तर + अयन = उत्तरेकडे सरकणे ) हे सूर्याच्या मकर संक्रमणाबरोबर असल्याने उत्तरायण व मकर संक्रमणाचा मेळ घातला जात होता. आणि म्हणूनच मकरसंक्रांतीचा सण त्या सुमारास सुरु झाला असावा.

पृथ्वी आपल्या सूर्याभोवती   ३६५  दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते.याचवेळी तिच्या भ्रमणकक्षेशीअसलेल्या कलामुळे या तिच्या वर्षंभराच्या भ्रमणकाळात आपल्याला ऋतू पाहायला मिळतात व त्याचबरोबर कमी जास्त लांबीचे (तासांचे)  दिवस रात्र देखील.

पण हे बदल देखील वर्षानुवर्षे सारखे राहात नाहीत.त्यात बदल होण्याचे कारण म्हणजे पृथ्वीची अजून एक गती जी परांचन गती (Precession) म्हणून ओळखली जाते.ह्या गतीबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे एखादा भोवरा त्याचा वेग कमी झाल्यावर जसा स्वतःच्या अक्षाभोवती गोते घेतो तशी गती म्हणजे परांचन गती (सोबतचे भोवऱ्याचे छायाचित्र).

या परांचन गतीचे पृथीचे वर्तुळ ( ३६०  अंश)  सुमारे २५८००  वर्षात पूर्ण होते. म्हणजेच एक अंश सरकण्यासाठी पृथीला सुमारे  ७२   वर्षे लागतात. मकरसंक्रांतीचा सण जेव्हा सुरु झाला असावा तेव्हा उत्तरायण मकर राशीत सुरु होत असावे म्हणजेच सुमारे  ७२ x २४  ( २२  डिसेंबर पासून १४ जानेवारी पर्यंतचे दिवस)=  १७२८ वर्षांपूर्वी, म्हणजे इ स ३०० च्या सुमारास ,  पण आज उत्तरायण  मात्र धनु राशीतील सूर्याच्या संक्रमणाने सुरु होते तर मकर संक्रमण मात्र  जानेवारीच्या सुमारास सुरु होते.

सूर्याचे हे मकर संक्रमण ज्या गतीने सरकते त्याचे एक चक्र आपल्याला पाहता येते व हे चक्र जवळपास ४० वर्षांचे (+/- ४ वर्षे ) असते. माझा मित्र अमेय गोखले याने त्याच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून हे सरकणे समजावून दिले आहे हे आपल्याला https://khagolmandal.com/khagolshastra/makarsankrant-marathi/ किंवा https://weather.com/en-IN/india/news/news/2021-01-14-date-game-of-makar-sankranti-unique-astronomical-significance या ठिकाणी पाहता येऊ शकेल.

यात आपल्याला एक गोष्ट समजेल ती म्हणजे सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाबरोबर संक्रांतीच्या तारखा कशा बदलतात हे. सूर्य दर वर्षी मकर राशीत सुमारे ६ तास ९ मिनिटे* उशीरा प्रवेश करतो. ही वरची ९ मिनिटे खूप महत्वाची आहेत. कारण ४ वर्षांत संक्रांत २४ तास ३६ मिनिटांनी पुढे जाते पण लीप वर्ष तिला फक्त २४ तासांनीच मागे खेचते. (लीप वर्षात जास्तीचा दिवस घेतल्यामुळे संक्रांत पुन्हा आधीच्या दिवशी येते.) ही साचलेली ३६ मिनिटे संक्रांतीला थोडं थोडं पुढे ढकलत राहतात.

संक्रांतीचा पण ४ वर्षाचा पॅटर्न असतो सध्या १४-१४-१५-१५ हा पॅटर्न वर्ष २००९-२०१२ पासून चालू आहे. म्हणजेच वर्ष २०२१ व २२ मध्ये संक्रांत १४ जानेवारीला असेल तर वर्ष २०२३ - २४ ला ती १५ जानेवारीला येईल. हे पॅटर्न दार साधारणपणे ४० वर्षांनी (+/- ४ वर्षे) बदलतात. शतकानंतर यात ८ वर्षांचा फरक पडतो कारण शतकी वर्ष लीप वर्ष नसतं .


याच प्रकाराने गणित करत मागे गेलो तर १७६१ ची संक्रांत १० जानेवारीला आली होती असे आपल्या लक्षात येईल. पुढील वर्षांतही या तारखा अशात सरकत पुढे पुढे जात राहतील व आपल्याला उत्तरायण साजरे करायचे असेल तर एक एक रास मागे सरकत जावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: