शुक्रवार, २४ जुलै, २०१५

ऑगस्ट महिन्याचे आकाश

ऑगस्ट महिन्यातील आकाश बरेच ढगाळलेले असल्याने तारकांचे दर्शन घडणे कठीण आहे. अधून मधून आकाश निरभ्र झाल्यास काही तारका चमकू लागतात , पण जेथे दिवसा सूर्याचे दर्शन घडणे कठीण अश्या पावसाळी महिन्यात रात्रीच्या आकाशाची फारशी अपेक्षा करता येत नाही. तसेच रात्रीचे आकाश देखील फारसे उल्लेखनीय नाही. भुजंगधारी हा तारकासमूह (१३ वी रास) डोक्यावरून थोडीशी सरकून पश्चिमेकडे जाताना दिसेल. विस्तीर्ण पसरलेल्या या तारकासमुहात सुर्य सुमारे ३ आठवडे घालवत असल्याने या तारका समूहाला तेरावी रास म्हणून मान्यता मिळालेली आहे. पोस्टाच्या पाकिटाच्या आकारातील धनु रास व त्यानंतरच्या मकर , कुंभ या राशी देखील अंधुक ताऱ्यांच्याच बनलेल्या आहेत.दक्षिणेकडील मुकुट हा दाटीवाटीच्या ताऱ्यांचा तारकासमूह सोडला तर इतर तारकासमूह ओळखता येणे देखील कठीण आहे.
सोबतच आकाश नकाशा जर रात्रौ ९ च्या सुमारास डोक्यावर धरून दिशा जुळवून पाहिला तर आपल्याला आकाश स्थितीची कल्पना येईल. कन्या रास मावळतीकडे झुकलेली आपल्याला आढळेल. तुळ , वृश्चिक राशी देखील यावेळी पश्चिमेकडे सरकू लागलेल्या असतील.
उन्हाळी त्रिकोण
उत्तरेकडे सप्तर्षी क्षितिजा जवळ जात असताना शर्मिष्ठा हा दुसरा दिशा दर्शक तारकासमूह पूर्व क्षितिजा कडे उगवलेला दिसतो. म्हणून या महिन्यात ध्रुव तारा ओळखण्यास आवश्यक असणारे दोन्ही तारका समूह आपल्याला रात्रौ ९ च्या सुमारास क्षितिजावर दिसतात. शर्मिष्ठेच्या वर वृषपर्वा हा पडक्या देवळाच्या आकाराचा पंचकोनी तारकासमूह दिसून येतो व याच्या काहीसा वर हंस व स्वरमंडळ हे तारकासमूह दिसतात. यातील स्वरमंडळ मधील अभिजित हा तारा रात्रौच्या आकाशातील  ५ व्या क्रमांकाचा ठळक तारा आहे. सूर्याच्या दुप्पट पृष्ठ भागाचे तापमान असलेल्या या ताऱ्याला एक जोड तारा देखील आहे. अभिजित, हंस व गरुड तारका समूहातील श्रवण या तीन ताऱ्यांचा जो त्रिकोण तयार होतो तो उन्हाळ्यात पूर्ण रात्रभर आकाशात असतो म्हणूनच या त्रिकोणाला उन्हाळी त्रिकोण (Summer Traingle)
असे म्हणतात.
पूर्वेकडून उगवणारा महाश्वाचा सुप्रसिद्ध चौकोन व त्याच्या जवळील देवयानी तारका समूहातील देवयानी दीर्घिका या गोष्टी यानंतरच्या महिन्यात अधिकाधिक सुंदर दिसू शकतील.

भुजंगधारी रास 
भुजंगाच्या विळख्यात सापडलेल्या शूर पुरुषाच्या चित्राने भुजंगधारी रास भूषविली आहे. इसवी सना पूर्वी युडोक्सास या ग्रीक खगोल अभ्यासकाने या राशीला अस्क्लेपिउस असे नाव दिल्याचा उल्लेख आढळतो. सध्याचा भुजंगधारी हा तोच अस्क्लेपिउस (Asclepius) असावा. ग्रीक देव अपोलो व जलपरी कोरोनीस यांचा हा मुलगा आणि ग्रीकांची वैद्य देवता. याला चिरोन ने वैद्यक शास्त्राचे धडे दिले आणि तो पुढे खलाशांचा वैद्य बनला. त्याच्या बरोबर बोटीने प्रवास करताना त्याने अनेकांचे प्राण वाचविले.
भुजंगधारी व जवळपासचे तारका समूह 
ओरायन हा शिकारी योद्धा देखील स्कोर्पिअन या विंचवाच्या दंशाने बेजार झाला होता. मर्त्य योद्ध्याला जर अस्क्लेपिउसने प्राणदान दिले तर अशी अनेक माणसे अमर होऊ लागतील व याचा पुढे देवांनाच त्रास होईल असे प्लुटो या देवाने देवराज झ्युसला सांगितले व प्लुटोचे म्हणणे मान्य करत अस्क्लेपिउसलाच यमसदनी पाठवण्यासाठी झ्युसने  भूजंगाची योजना केली व नंतर भुजंग व भुजंगधारी या दोघानाही आकाशात स्थान दिले. आकाशातील या भूजन्गाचे डोके व शेपटी असे दोन भाग पडतात.
रास अलघ हा या राशीतील ठळक तारा आपल्यापासून अवघ्या ५४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. या राशीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण तारा म्हणजे बर्नार्डचा तारा. हा तारा आकाशातील सर्वात जास्त चाल गती असलेला तारा आहे. अवघ्या ५.९१ प्रकाशवर्षे अंतरावर असणारा हा तारा मित्र ताऱ्यानंतरचा सुर्यामालेला सर्वात जवळ असणारा दुसऱ्या क्रमांकाचा तारा आहे. वर्षाला १०.३१ आर्क सेकंद इतकी चाल गती असणारा हा तारा ३५१ वर्षात आकाशातील १ अंश सरकतो. त्याची दृश्य प्रत +९.५ सेकंद इतकी कमी असल्याने आपल्याला तो साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. साध्या डोळ्यांनी आपल्याला साधारणपणे +६.० प्रती पर्यंतचे तारे दिसू शकतात. या ताऱ्याच्या सध्याच्या स्थानाजवळ आय सी ४६६५ हा दुर्बिणीतून पाहता येण्या सारखा खुला तारका गुच्छ देखील दृष्टीस पडतो. मेसिए या शास्त्रद्याने केलेल्या ११० अवकाशस्थ वस्तूंच्या यादीतील ८ वस्तूंचा या तारका समुहात समावेश होतो. M९, M१०, M१२, M१४, M१६, M१९, M६२ व M१०७ या त्या गोष्टी होत. यातील  बरेचसे तारका गुच्छ असून दुर्बिणीच्या सहाय्याने आपल्याला दिसू शकतात. यातील M१६ हा  भुजंग तारकासमुहात मोडतो व ईगलचा तेजोमेघ या नावाने ओळखला जातो. 

७० ओफिउकि या नावाने ओळखला जाणारा तारा प्रत्यक्षात द्वैती असून त्याचा शोध १७७९ मध्ये सर विल्यम हर्शल यांनी लावला. R S ओफिउकि हा आणखी एक वैशिष्ट्य पूर्ण तारा. १८९८, १९३३, १९५८,१९६७ या वर्षांमध्ये या ताऱ्यात स्फोट घडून येउन एरवी अंधुक असणारा हा तारा नुसत्या डोळ्यांनी पाहता येण्या एवढा तेजस्वी झाला होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: