शुक्रवार, २४ जुलै, २०१५

ऑगस्ट महिन्याचे आकाश

ऑगस्ट महिन्यातील आकाश बरेच ढगाळलेले असल्याने तारकांचे दर्शन घडणे कठीण आहे. अधून मधून आकाश निरभ्र झाल्यास काही तारका चमकू लागतात , पण जेथे दिवसा सूर्याचे दर्शन घडणे कठीण अश्या पावसाळी महिन्यात रात्रीच्या आकाशाची फारशी अपेक्षा करता येत नाही. तसेच रात्रीचे आकाश देखील फारसे उल्लेखनीय नाही. भुजंगधारी हा तारकासमूह (१३ वी रास) डोक्यावरून थोडीशी सरकून पश्चिमेकडे जाताना दिसेल. विस्तीर्ण पसरलेल्या या तारकासमुहात सुर्य सुमारे ३ आठवडे घालवत असल्याने या तारका समूहाला तेरावी रास म्हणून मान्यता मिळालेली आहे. पोस्टाच्या पाकिटाच्या आकारातील धनु रास व त्यानंतरच्या मकर , कुंभ या राशी देखील अंधुक ताऱ्यांच्याच बनलेल्या आहेत.दक्षिणेकडील मुकुट हा दाटीवाटीच्या ताऱ्यांचा तारकासमूह सोडला तर इतर तारकासमूह ओळखता येणे देखील कठीण आहे.
सोबतच आकाश नकाशा जर रात्रौ ९ च्या सुमारास डोक्यावर धरून दिशा जुळवून पाहिला तर आपल्याला आकाश स्थितीची कल्पना येईल. कन्या रास मावळतीकडे झुकलेली आपल्याला आढळेल. तुळ , वृश्चिक राशी देखील यावेळी पश्चिमेकडे सरकू लागलेल्या असतील.
उन्हाळी त्रिकोण
उत्तरेकडे सप्तर्षी क्षितिजा जवळ जात असताना शर्मिष्ठा हा दुसरा दिशा दर्शक तारकासमूह पूर्व क्षितिजा कडे उगवलेला दिसतो. म्हणून या महिन्यात ध्रुव तारा ओळखण्यास आवश्यक असणारे दोन्ही तारका समूह आपल्याला रात्रौ ९ च्या सुमारास क्षितिजावर दिसतात. शर्मिष्ठेच्या वर वृषपर्वा हा पडक्या देवळाच्या आकाराचा पंचकोनी तारकासमूह दिसून येतो व याच्या काहीसा वर हंस व स्वरमंडळ हे तारकासमूह दिसतात. यातील स्वरमंडळ मधील अभिजित हा तारा रात्रौच्या आकाशातील  ५ व्या क्रमांकाचा ठळक तारा आहे. सूर्याच्या दुप्पट पृष्ठ भागाचे तापमान असलेल्या या ताऱ्याला एक जोड तारा देखील आहे. अभिजित, हंस व गरुड तारका समूहातील श्रवण या तीन ताऱ्यांचा जो त्रिकोण तयार होतो तो उन्हाळ्यात पूर्ण रात्रभर आकाशात असतो म्हणूनच या त्रिकोणाला उन्हाळी त्रिकोण (Summer Traingle)
असे म्हणतात.
पूर्वेकडून उगवणारा महाश्वाचा सुप्रसिद्ध चौकोन व त्याच्या जवळील देवयानी तारका समूहातील देवयानी दीर्घिका या गोष्टी यानंतरच्या महिन्यात अधिकाधिक सुंदर दिसू शकतील.

भुजंगधारी रास 
भुजंगाच्या विळख्यात सापडलेल्या शूर पुरुषाच्या चित्राने भुजंगधारी रास भूषविली आहे. इसवी सना पूर्वी युडोक्सास या ग्रीक खगोल अभ्यासकाने या राशीला अस्क्लेपिउस असे नाव दिल्याचा उल्लेख आढळतो. सध्याचा भुजंगधारी हा तोच अस्क्लेपिउस (Asclepius) असावा. ग्रीक देव अपोलो व जलपरी कोरोनीस यांचा हा मुलगा आणि ग्रीकांची वैद्य देवता. याला चिरोन ने वैद्यक शास्त्राचे धडे दिले आणि तो पुढे खलाशांचा वैद्य बनला. त्याच्या बरोबर बोटीने प्रवास करताना त्याने अनेकांचे प्राण वाचविले.
भुजंगधारी व जवळपासचे तारका समूह 
ओरायन हा शिकारी योद्धा देखील स्कोर्पिअन या विंचवाच्या दंशाने बेजार झाला होता. मर्त्य योद्ध्याला जर अस्क्लेपिउसने प्राणदान दिले तर अशी अनेक माणसे अमर होऊ लागतील व याचा पुढे देवांनाच त्रास होईल असे प्लुटो या देवाने देवराज झ्युसला सांगितले व प्लुटोचे म्हणणे मान्य करत अस्क्लेपिउसलाच यमसदनी पाठवण्यासाठी झ्युसने  भूजंगाची योजना केली व नंतर भुजंग व भुजंगधारी या दोघानाही आकाशात स्थान दिले. आकाशातील या भूजन्गाचे डोके व शेपटी असे दोन भाग पडतात.
रास अलघ हा या राशीतील ठळक तारा आपल्यापासून अवघ्या ५४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. या राशीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण तारा म्हणजे बर्नार्डचा तारा. हा तारा आकाशातील सर्वात जास्त चाल गती असलेला तारा आहे. अवघ्या ५.९१ प्रकाशवर्षे अंतरावर असणारा हा तारा मित्र ताऱ्यानंतरचा सुर्यामालेला सर्वात जवळ असणारा दुसऱ्या क्रमांकाचा तारा आहे. वर्षाला १०.३१ आर्क सेकंद इतकी चाल गती असणारा हा तारा ३५१ वर्षात आकाशातील १ अंश सरकतो. त्याची दृश्य प्रत +९.५ सेकंद इतकी कमी असल्याने आपल्याला तो साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. साध्या डोळ्यांनी आपल्याला साधारणपणे +६.० प्रती पर्यंतचे तारे दिसू शकतात. या ताऱ्याच्या सध्याच्या स्थानाजवळ आय सी ४६६५ हा दुर्बिणीतून पाहता येण्या सारखा खुला तारका गुच्छ देखील दृष्टीस पडतो. मेसिए या शास्त्रद्याने केलेल्या ११० अवकाशस्थ वस्तूंच्या यादीतील ८ वस्तूंचा या तारका समुहात समावेश होतो. M९, M१०, M१२, M१४, M१६, M१९, M६२ व M१०७ या त्या गोष्टी होत. यातील  बरेचसे तारका गुच्छ असून दुर्बिणीच्या सहाय्याने आपल्याला दिसू शकतात. यातील M१६ हा  भुजंग तारकासमुहात मोडतो व ईगलचा तेजोमेघ या नावाने ओळखला जातो. 

७० ओफिउकि या नावाने ओळखला जाणारा तारा प्रत्यक्षात द्वैती असून त्याचा शोध १७७९ मध्ये सर विल्यम हर्शल यांनी लावला. R S ओफिउकि हा आणखी एक वैशिष्ट्य पूर्ण तारा. १८९८, १९३३, १९५८,१९६७ या वर्षांमध्ये या ताऱ्यात स्फोट घडून येउन एरवी अंधुक असणारा हा तारा नुसत्या डोळ्यांनी पाहता येण्या एवढा तेजस्वी झाला होता. 

शुक्रवार, १७ जुलै, २०१५

ध्रुवतारा स्थिर नाही !

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे.उत्तानपाद नावाचा एक राजा होता.त्याला सुरुची आणि सुनीती या दोन राण्या होत्या.यापैकी सुरुची होती आवडती तर सुनीती होती नावडती. या दोघीनाही एक एक मुलगा होता.सुरुची राणीच्या मुलाचे नाव होते उत्तम तर सुनितीच्या मुलाचे नाव होते “ध्रुव”.सुरुची आवडती राणी असल्याने अर्थातच तिचा मान जास्त. या दोन्ही राण्यांची मुळे एके दिवशी आपल्या सवंगड्याबरोबर खेळात होती. खेळून दमल्यावर दोघेही उत्तानपाद राजाच्या महालात आले.तेथे गेल्यावर उत्तम आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसला.त्याला तेथे बसलेले पाहताच ध्रुवदेखील दुसऱ्या मांडीवर जाऊन बसला.त्यावेळी राणी सुरुची तेथे आली.ध्रुव देखील आपल्या मुलाच्या उत्तमच्या  बरोबरीने राजाच्या मांडीवर बसला आहे हे पहातच ती संतापली आणि तिने ध्रुवाला तेथून खसकनओढले आणि म्हणाली ही तुझी जागा नाही. येथे फक्त माझा उत्तमच बसू शकेल. रडणारा ध्रुव मग आपल्या आईकडे,राणी सुनितीकडे गेला आणि त्याने घडलेली घटना सांगितली आणि आपल्याला परत तेथे बसायला मिळावे हा हट्ट धरला. राणी सुनीती आपल्या बाळाला समजावत म्हणाली, बाळ, आपण महाराजांचे नावडते आहोत म्हणून आपल्याला ती जागा मिळणार नाही. देवाने आपल्याला ठेवले तसेच रहायला हवे. तिने असे म्हणताच ध्रुव देवाला शोधायला निघाला. घोर तपश्चर्या करीत त्याने भगवान विष्णुना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून अशी जागा मागून घेतली की जेथून त्याला कोणी हलवू शकणारनाही.भगवंतांनी त्याला “तथास्तु” म्हणत अढळपद दिले आणित्याला उत्तर दिशेकडील आकाशात स्थान दिले.हाच तो आपण दाखवतो तो ध्रुवतारा.
वर सांगितलेली “ काल्पनिक” गोष्ट आपण सर्वानी लहानपणी ऐकलेली आहे. आपल्या उत्तर दिशेकडे रात्रीच्या आकाशात एक तारा आहे ज्याला आपण ध्रुव तारा म्हणून ओळखतो आणि हा तारा स्थिर रहात रात्रीच्या आकाशात आपल्याला दिशा ओळखण्यास मदत करतो एवढाच या गोष्टीचा मतितार्थ आहे. प्रत्यक्षात तेथे कुणी ध्रुवबाळ बसलेला नाही अथवा ध्रुव तारा विशेष महत्वाचा तारा देखील नाही.

ध्रुव ताऱ्याचे स्थान :
सूर्याभोवती पृथ्वी ज्या मार्गाने भ्रमण करते त्या मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वीचा अक्ष या आयनिक वृत्ताला २३-१/२ अंशाने कळलेला आहे.पृथ्वीचा हा कललेला अक्ष उत्तर ध्रुवाच्या बाजूला ज्या ताऱ्याच्या दिशेने रोखलेला आहे तो तारा म्हणजे ध्रुव तारा. हा तारा कोणताही विशेष तारा नसून दुसऱ्या प्रतीचा एक सामान्य तारा आहे. या ताऱ्याला एक जोड तारा देखील आहे परंतु त्याला पाहण्यासाठी आपल्याला शक्तिशाली दुर्बिणीची मदत घ्यावी लागते. प्रत्यक्षात सूर्यापेक्षा जास्त तेजस्वी असलेला ध्रुवतारा सुमारे ६८० प्रकाशवर्षे इतक्या प्रचंड अंतरावर असल्याने आपल्यासाठी सामान्य तारा ठरतो. हा तारा ओळखण्यासाठी आपल्याला शर्मिष्ठा अथवा सप्तर्षी या दोहोंपैकी एखाद्या ताराकासामुहाची मदत घ्यावी लागते. यापैकी शर्मिष्ठा हा तारकासमूह इंग्रजी “W” (उलटा) आकाराचा आहे तर सप्तर्षीचे सात तारे एखाद्या मोठ्या चमच्याच्या आकारात मांडलेले आढळतात.

ध्रुवताऱ्याचे स्थान-महात्म्य 
असा हा ध्रुव तारा आपल्याला पृथ्वीच्या अक्षाच्या रोखणे असल्यामुळे सतत एकाच ठिकाणी असल्याचे दिसते. हा तारा आपल्यासाठी दिवसादेखील आकाशात असतो.( परंतु सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसत नाही) आणि रात्री पाहिले असता इतर आकाश या ताऱ्याभोवती फिरताना दिसते. यामुळे रात्री आपल्याला उत्तर दिशा तर अचूकपणे ओळखता येतेच परंतु त्याच बरोबर आपल्याला एखाद्या ठिकाणचे अक्षांशदेखील सांगता येऊ शकतात. ध्रुवताऱ्याची  आपल्या निरीक्षणाच्या ठिकाणच्या क्षितीजापासुनची अंशात्मक उंची म्हणजेच त्या ठिकाणाचे अक्षांश असतात.उदाहरणार्थ, मुंबईचे अक्षांश सुमारे १९ अंश आहेत म्हणजे ध्रुवतारा मुंबईतून क्षितिजापासून सुमारे १९ अंश उंचीवर दिसेल. कोनात्मक अंतर मोजण्यासाठी आपण आपल्या हाताच उपयोग करून अंदाजे अंतर काढू शकतो. यासाठी हात (कोपरात न वाकवता )सरळ ठेवून एक डोळा बंद करून येणारी वेगवेगळी अंतरे सोबतच्या आकृतीत दाकाविली आहेत. हात सरळ असताना होणारे एक वीत अंतर (अंगठा ते करंगळी यांचे टोक) सुमारे २० अंश असते. आपण आपल्या ठिकाणाचे अक्षांश असे ताडू शकतो.

ध्रुवतारा स्थिर नाही 
आपण ध्रुव ताऱ्याला जरी स्थिर मनात आलो असलो तरी प्रत्यक्षात तो स्थिर नाही. याचे कारण ताऱ्याची गती हे नसून पृठीची परांचन गती (Precession) हे आहे. या परांचन गतीमुळे पृथ्वीच्या अक्षाचा रोख बदलत रहातो आणि हा रोख सतत बदलत गेल्यामुळेच ध्रुव तारा अक्षाच्या दिशने स्थिर राहणार नाही. परंतु ही गती अत्यंत कमी असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही इतकेच. एखादा भोवरा फिरवला असता त्याचा वेग मंदावताना तो ज्या प्रमाणे गिरक्या घेतो त्याचप्रमाणे पृथ्वीचा अक्ष गिरक्या घेत आहे. यातील एक गिरकी पूर्ण होण्याचा कालावधी सुमारे २५८०० वर्षांचा आहे. याचाच अर्थ जेव्हा पृथ्वीच्या अक्षाचा रोख बदलत जाईल तेव्हा मध्ये त्या अक्षाच्या रोखणे कोणताच तारा असणार नाही (जशी स्थिती दक्षिण गोलार्धात सध्या आहे) वा दुसराच एखादा तारा आपला ध्रुवतारा बनेल. हे चक्र पूर्ण झाल्यावर पृथ्वीचा अक्ष २५८०० वर्षांनी पुन्हा सध्याच्या आपल्या ध्रुव ताऱ्याकडे रोखला जाईल. (या कालावधीत याचे स्थान देखील विचलित झालेले असेल). म्हणजे आपण आजवर मनात असलेला ध्रुवतारा स्थिर नाही एवढे मात्र निश्चित.

परांचन गतीचे कारण 
इसवी सनापूर्वी सुमारे २५० वर्षांपूर्वी ग्रीक कवि अरेटसने आपल्या “द फेनामेना” नावाच्या काव्य ग्रंथात काही तारका समूहांची वर्णने करून ठेवली होती. ई.स.पूर्व १२५ च्या सुमारास ग्रीक खगोल शास्त्रज्ञ हिप्पार्कसने या काव्यातील वर्णनाचा अभ्यास केला. या अभ्यासांती त्याला या वर्णनांमध्ये काही त्रूटी आढळून आल्या. या त्रूटी वरून हिप्पार्कसने संपात बिंदूचे चलन होत असल्याचा निष्कर्ष काढला आणि ताराकासमूहांची फेर विभागणी केली.
हिप्पार्कसच्या काळापासून संपात बिंदूचे चलन (आयनिक वृत्त आणि वैषुविक वृत्त यांच्या काल्पनिक छेदन बिंदुना संपात बिंदू असे म्हणतात) ज्ञात असले तरी ते पृथ्वीच्या परांचन गतीमुळे होत असावे हे मात्र न्युटन ने प्रतिपादिले. हे प्रतिपादन करतानाच पृथ्वीच्या अ-वर्तुळाकार स्थितीमुळे तिच्यावर होणाऱ्या सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे हे घडत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नसून धृवीय प्रदेशात चपटा तर विषुववृत्तीय प्रदेशात लांबोडका असल्याने आणि तसेच पृथ्वीचा अक्ष आयनिक वृत्ताला २३-१/२ अंशाने कलला असल्याने पृथीवर कार्य करणारे चंद्र सूर्याचे आणि विशाषत: सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या केंद्रस्थानी कार्य न करता त्यापासून काही अंतरावर कार्यरत होते. या परिणामातून तयार होणारे बलयुग्म पृथ्वीच्या दोलायमान अवस्थेस कारणीभूत होते आणि त्यापासून ही परांचन गती निर्माण होते. या परांचन गतीमुळे संपात बिंदूचे प्रतिवर्षी सुमारे ५० आर्क सेकंद इतके चलन होते. सामान्यांसाठी हे चलन नगण्य असले तरी खगोल शास्त्रज्ञांसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे.

बदलते ध्रुवतारे :
परांचन गतीमुळे होणाऱ्या संपात बिंदूच्या चलनामुळे आपल्याला वेगवेगळया कालावधी मध्ये वेगवेगळे ध्रुवतारे मिळतील हे आपण पहिलेच. इतिहासावर नजर टाकली असता आपल्याला असे आढळून येते की गिझाच्या पिरॅमिडच्या बांधणीच्या सुमारास कालेय (Draco) तारकासमूहातील “थुबान” या नावाने ओळखला जाणारा α तारा आपलं ध्रुव तारा असावा आणि या पिरॅमिडची रचना या ताऱ्याचे त्यावेळी एकाच जागी असण्याचे वैशिष्ठ्य लक्षात घेवून केली गेली असावी. याचे मुख्य कारण म्हणजे या पिरॅमिडमध्ये असणाऱ्या खुफू राजाच्या थडग्यावरच्या गवाक्षाची दिशा. ही दिशा त्यावेळी थुबान ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी रोखलेली आढळते. म्हणजेच राजाच्या थडग्यावर रात्रंदिवस प्रकाश पडत राहावा अशी ही योजना आहे. सध्याचा ध्रुवतारा मात्र काही अंशांनी दूर असल्यामुळे तो थडग्यातील गावाक्षाच्या सरळ रेषेत येत नाही. अर्थात हा तर्क असून त्याला सबळ पुरावा नाही. ई.स.पूर्वी ४६०० वर्षांपूर्वी ध्रुवतारा असणारा थुबान या स्थानापासून विचलित झाला तो पुथ्वीच्या परांचन गतीमुळे. आपलं साध्याचा ध्रुवतारा देखील असाच विचलित होत राहील व मधल्या कालावधीत आपल्याला एकही तारा ध्रुवतारा म्हणून दाखवता येणारं नाही. यापुढील वर्तुळ परिक्रमेत वृषपर्वा तारकासमूहातील α तारा ई.स. ८४०० च्या सुमारास तर स्वरमंडळ तारकासमूहातील ‘अभिजीत’ हा ठळक तारा ई.स. १४८०० च्या सुमारास ध्रुव ताऱ्याची जागा घेईल मात्र यापैकी कोणताही तारा सध्याच्या धृवाताऱ्याइतका उत्तरेकडील ध्रुवाक्षाच्या इतक्या जवळ येणारं नाही.

शुक्रवार, १० जुलै, २०१५

वैज्ञानिक पर्यटनस्थळ लोणार

अजंठा , वेरूळ हि जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आपल्या सर्वांच्याच  परिचयाची आहेत. प्राचीन चित्र आणि  शिल्पकलेचा अद्वितीय वारसा सांभाळणाऱ्या या ठिकाणांच्या जवळच सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आपल्या महाराष्ट्रातच निसर्गाने बहाल केलेल्या अतिप्राचीन अशा वैज्ञानिक वारश्याने सजलेले एक पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे लोणार

सुमारे ५०,००० वर्षापूर्वीची तो घटना असावी अवकाशात इतस्तत: भरकटत फिरणाऱ्या अनेक उल्काभांपैकी एक उल्काभ पृथ्वीच्या दिशेने झेपावला. वातावरणाचे कवच भेदत तो भूपृष्ठाकडे सरकला आणि त्याने आघात केला तो दगडी छातीच्या महाराष्ट्र भूमीवर. आज याच आघाताची खूण हि महाराष्ट्र भूमी गौरवाने मिरवते आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या तालुक्याच्या गावी. पृथ्वीवर पडलेल्या या अशनीने तयार झालेला हा खड्डा वा विवर सुमारे . कि मी व्यासाचे आहे.

विवराचे रुपांतर सरोवरात

जागतिक नकाशावर देखील लोणारचे विवर आले तेदेखील अनेक संशोधकांच्या परिश्रमाने. लोणारच्या सपाट प्रदेशमध्ये असणारा एवढा मोठा वर्तुळाकृती आकाराचा हा खड्डा निश्चितच कुतूहल जनक होता. या ठिकाणी असणाऱ्या गोड्या पाण्याच्या झऱ्या मुळे या विवाराचे रुपांतर सरोवरात झालेले होते. अश्या ठिकाणी एखादे सरोवर वा विवर का असावे याचा शोध घेण्याचा प्रयत्न बऱ्याच आधीपासून झालेला आढळतो. बरीचशी विवरे ज्वालामुखीजन्य देखील असू शकतात. ज्वालामुखीचा उद्रेक  झाल्यावर लाव्हारसाचे थर तयार होतात. या विवर परिसरातही असे ठार आढळून येतात. परंतु दक्खन पठारावरील ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यामुळे तयार झालेले ज्वालामुखीचे थर हि लाखो वर्षापूर्वीची प्रक्रिया आहे , त्यामानाने हे विवर अगदीच तरुण म्हणजे सुमारे ५०,००० वर्षाचे असल्याचे तेथील भूगार्भाच्या अभ्यासावरून आढळले आहे.
लोणारच्या विवराचे वेगळेपण लक्षात घेत याचा अभ्यास जे. . अलेक्झांडर यांनी १८२३ मध्ये केल्याचा आढळतो. तर १८९६ मध्ये जी. के. गिल्बर्ट या संशोधकाने अमेरिकेतील अरिझोना विवराचे या विवरशी साधर्म्य असल्याचे सुचविले होते. यांचा सुरुवातीचा रोख मात्र हे विवर ज्वालामुखीजन्य असावे असाच होता. परंतु १९७५ च्या सुमारास भारतीय भू-सर्वेक्षण संस्था आणि अमेरिकेतील स्मिथसोउनिअन इन्स्टीटूट यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात हे विवर अशनी आघात विवर असल्याचे सिद्ध झाले.

लोणार ला कसे जाणार ?

लोणारला जाण्यासाठी रेल्वेच्या मलकापूर , नांदुरा , जलंब , शेगाव किंवा अकोला या स्थानकांवर उतरून मेहेकर मार्गे जाता येऊ शकते. औरंगाबाद हून जालना , देऊळगावराजा , सिंदखेडराजा , सुलतानपूर मार्गे लोणारला जाता येते. या मार्गाने स्वताच्या वाहनाने गेल्यास वाटेत थांबून इतरही काही महत्वाची स्थळे पाहत येतात. यात देऊळगावराजाचा अंगठ्या एवढा बालाजी , सिंदखेडराजा या जिजाबाई च्या माहेर गावातील लखुजी जाधव रावांचा वाडा , पुतळा बारव इत्यादींचा समावेश होतो.

लोणार मध्ये  काय पाहाल ?
लोणार गावातील लोणार विवर सरोवराचे दर्शन हीच एकमेव महत्वाची गोष्ट नसून या विवरात उतरून तेथून मारलेला फेरफटका फार महत्वाचा आहे. या विवरातील  पाण्याच्या काठावर अनेक मंदिरे आढळतात. विवराच्या पूर्व काठावर असलेल्या शासकीय विश्राम धामाच्या दक्षिणेकडे असलेल्या पायऱ्या उतरून गेल्यास आपल्याला संपूर्ण विवराच्या फेरीमध्ये पुढील विवरे दिसतात.

रामगया मंदिर : पश्चिमा भिमुख असलेल्या या मंदिरात फक्त रामाचीच मूर्ती आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजा समोर मारुती असलेली घुमटी आहे.
शंकर गणेश मंदिर : यात मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराची पिंडी असून गणेश मूर्ती गाभाऱ्याच्या दरवाजासमोर आहे.
वाघ महादेव मंदिर : हे मंदिर काठाच्या जवळ असून बरेचसे झाडीत लपलेले आहे.
मोर महादेव मंदिर : सरोवराच्या काठाशी असलेल्या या पूर्वाभिमुख मंदिरात काहीशी भंगलेली पिंडी आहे.
कमलजा देवी मंदिर : विवारातील हे सर्वात प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात भाविकांची वर्दळ असल्याने हे चांगल्या स्थितीत आहे. नवरात्रीत येथे जत्रा भरते. मंदिराला दिल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगामुळे हे मंदिर दुरूनही ओळखता येऊ शकते. मंदिरासमोर दीपमाळ असून गोड्या पाण्याची विहिर्देखील आहे परंतु हि विहीर सरोवराच्या खाऱ्या पाण्याखाली बुडालेली असते.
अंबरखाना महादेव मंदिर : सरोवराच्या पश्चिम काठावरील हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात पिंडी आणि गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेश पट्टी आहे.
मुंगळा महादेव मंदिर : पूर्वाभिमुख पण पडक्या अवस्थेतील मंदिर
चोपड्याचे महादेव मंदिर : पूर्वाभिमुख पण पडक्या मंदिरातील पिंडी मात्र चांगल्या अवस्थेत आहे.
शुक्राचार्य शाळा : सरोवराच्या परीक्रमेतील ईशान्य कडेवरील हे शेवटचे मंदिर. येथे बरेच कोरीव काम असलेले दगड आढळतात. मंदिराचे खांब , गाभाऱ्याचा घुमट  यावर विविध प्रकारची नक्षी , देवदेवता कोरलेल्या आहेत. येथील पिंडी उघड्यावर असून मोठ्या आकाराचा नंदी मात्र गाभाऱ्यात सूरक्षित आहे.

धार मंदिर समूह
शुक्राचार्य शाळा मंदिराकडे असणाऱ्या खाचेतून वर चढले असता धार मंदिर समूह लागतो. वर्षाचे बाराही महिने येथील गोमुखातून पडणारी संतत धार हे या धारा मंदिराचे वैशिष्ठ . हेच गोडे पाणी पुढे विवराच्या पाण्याला जाऊन मिळते.

धारेसामोरील वडाच्या झाडाखालील जागा महानुभाव पंथीयांच्या चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली असल्याचे सांगण्यान येते. देवगिरीचे सम्राट कृष्णदेवराय यांचे गर्वहरण केल्याची कथा देखील लीळा चरित्रात दिलेली आहे.
सम्राट  कृष्णदेवरायाने ओतलेल्या संपत्तीकडे ढुंकूनही पहाता चक्रधरस्वामी मठात निघून गेले. या महापुरुषाचा हा निस्वार्थी पणा पाहून सम्राटाला आपली चूक उमगली आणि ते चक्रधर स्वामींना शरण गेले अशी ती कथा आहे. धार मंदिर समूहात शिव , विष्णू , गणपती , जगदंबा अशी काही मंदिर आहेत.

दैत्य सुदन मंदिर
लोणार गावात देखील पाहण्या सारखे एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजे दैत्यसुदनाचे. .. १८७८ मध्ये मातीच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करीत असता या मंदिराचे अस्तित्व लक्षात आले. उत्तराभिमुख महाद्वार असणाऱ्या या मंदिराचा आकार अनियमित ताऱ्यासारखा आहे. अनेकविध देवतांची शिल्पे आणि कामशिल्पे असणाऱ्या या मंदिरावर असणारे लवणासुर वध  कथा हे विवर निर्मितीशी संबंध दर्शविणारे शिल्पादेखील आहे. याची कथा पद्म पुराणांत सांगितली आहे. उन्मत्त झालेल्या लवणासूर या दैत्याचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णूस केली तेव्हा या दैत्याला मी आघात रूपाने मारेन असे श्री विष्णूनी पृथ्वीला सांगितले. तेव्हा या आघात वेळी आपलाही नाश होऊ नये अशी विनंती पृथ्वीने केली तेव्हा विष्णूने हा आघात बालरूपात येउन केला आणि लवणासुराचा  वध केला. त्याच लवणासुराच्या अस्थींमुळे हे विवर खाऱ्या पाण्याचे झाले असे या कथेत सांगितले आहे.
अंबरतळे आणि झोपलेला मारुती :
लोणारच्या विवराच्या उत्तरेकडे असलेल्या विवराला अंबरतळे या नावाने ओळखले जाते. हे एक छोटे विवर असून याच्या जवळ निद्रिस्त मारुतीचे एक देऊळ आहे. या मारुतीच्या मूर्तीजवळ चुम्बाक्सुची नेताच तिचे विचलन होते.

वैज्ञांनिक वारश्याची  निगा

हळू हळू एक महत्वाचे पर्यटन केंद्र बनत चाललेल्या लोणारला हजारो पर्यटक भेट देत असतात. पण पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळेच येथील पर्यावरणाला धोका निर्माण होऊ लागला आहे. पर्यटकांचे थवे आपल्या बरोबर आणलेले खाद्यपदार्थ आणि प्लास्टिकच्या पिशव्या तेथेच टाकून जातात आणि त्यांची विल्हेवाट लावणे कठीण असल्यामुळे हा परिसर बकाल होऊ पाहत आहे. गावातील एक शिक्षक श्री सुधाकर बुगदाणे यांच्या अथक परिश्रमाने लोणार विवर शासनाच्या आणि पर्यटकांच्या नजरेत आले तर खरे पण याच्यामुळे या परिसराचा विकास होता येथील बकालपणा वाढेल अशीच भीती वाटते. यासाठी सर्व पर्यटकांनी देखील साथ देणे गरजेचे आहे कारण हा ठेवा केवळ लोणारचाच नसून , महाराष्ट्राचा भारताचा देखील आहे

शुक्रवार, ३ जुलै, २०१५

आकाशाशी जडवू नाते

आपल्या सभोवार पसरलेल्या आकाशाचा आणि अथांग अवकाशाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच खगोलशास्त्र. आकाशात रोज रात्रो चमचमणाऱ्या असंख्य तारका,अग्नी गोलासारखा भासणारा आणि दिवसा सर्व दिशा उजळून टाकणारा सूर्य, पृथ्वीच्या विशिष्ठ स्थितीमुळे निर्माण होणारे ऋतू या सर्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न मानवाने केला नसता तरच नवल! आणि मग त्यातूनच अमुक एका तारका समूहात सूर्य किवा चंद्र असला की एखादी घटना घडून येते असे लक्षात येऊ लागले आणि त्यातूनच ठोकताळे बांधणारे अंदाजशास्त्र तयार झाले.

खगोल शास्त्राचा विकास मात्र धीम्या गतीने परंतु ठामपणे होत होता.या विकास वाटेवर खगोल शास्त्राला धर्म- सत्तेचा व राजसत्तेचाही सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात पृथ्वी हीच विश्वाचा केंद्रबिंदू असल्याची पाश्च्यात्य संकल्पना रूढ झाली होती. ह्या संकल्पनेला धक्का देणारा सूर्यकेंद्री विश्वाचा सिद्धांत इ.स:-१५४३ मध्ये कोपर्निकसने मांडताच त्याला तत्कालीन धर्मसंस्थांनी प्रखर विरोध केला. अर्थातच त्या नंतरच्या केप्लर, गेलिलीओ, न्यूटन आदि खगोल शास्त्रज्ञांनी केलेल्या निरीक्षणांद्वारे कोपर्निकसच्या सिद्धांताचे प्रमाण मिळाल्यानंतर त्याची संकल्पना सर्वमान्य झाली ही बाब वेगळी.

दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम खागोलशास्त्रासाठी करणाऱ्या महान इटालीअन खगोल शास्त्रज्ञ गेलिलीओ गलिली ह्याला देखील अश्या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. त्याच्यावर धर्मसत्तेविरुद्ध कट करण्याचा आरोप देखील ठेवला गेला.१७ व्या शतकात लावलेले हे आरोप तब्बल तीन शतका नंतर,म्हणजेच १९९२ साली (२० व्या शतकात). मागे घेण्यात आले.

गुढ जाणून घेण्याची मानवी मनाची उत्सुकता त्याच्या विकासाला कारणीभूत ठरत असते.खगोल शास्त्राचा विकास देखील ह्याच तत्वावर आधारलेला आहे.सूर्य आकाशातून भ्रमण करीत असताना त्याच्या तेजामुळे त्याच्या पार्श्वभूमीवरील तारकासमूह पाहता येत नाही. चंद्राच्या भ्रमणमार्गावरील तारकासमूह मात्र त्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येतात. याचाच वापर करत प्राचीन भारतीयांनी आकाशाची विभागणी चान्द्रमार्गावरील २७ तारकासमुहात केली आणि या ताराकासामुहाना नक्षत्र असे संबोधले.मात्र पाश्चात्यांनी सूर्याचा वर्षाभराचा कालावधी १२ ताराकासमुहान मध्ये विभागला.ज्याना आपण राशी म्हणून ओळखतो.सूर्य व चंद्राचे भ्रमण मार्ग एकाच असल्यामुळे या १२ राशींचे २७ नक्षत्रांमध्ये विभाजन झालेले दिसते. २९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधी मध्ये सूर्य कोणत्याही प्रचलित राशीत नसून तो वृश्चिक आणि धनु या राशींच्या दरम्यान असणाऱ्या भुजंगधारी या तारकासमुहात असतो व म्हणूनच आत्ता भूजंगधारी ताराकासमुहाला १३वी रास म्हणून मान्यता मिळाली आहे.

रात्रीच्या चमकत्या ताऱ्यांनी खचाखच भरलेल्या आकाशात नेमका तारा शोधणे आपल्याला कठीण वाटू शकते.आपल्या पूर्वजांना देखील याची जाणीव होती.व म्हणूनच तारकासमुहांचे आकार लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी अगदी सोपा मार्ग अवलंबिला.तो म्हणजे या ताऱ्यांच्या विशिष्ठ समूहाना वेगवेगळे प्राणी,पक्षी,मानवी आणि दैवी आकृत्यात जोडून त्यांच्यावर गोष्टी गुंफण्याचा. या मार्गाद्वारे आकाश लक्षात ठेवणे व नकाशावर उतरवणे देखील सोपे झाले.

अशा प्रकारची काल्पनिक विभागणी सर्वप्रथम कधी झाली असावी हे सांगणे अवघड असले तरी विविध् आकृत्यात गुंफलेले हे तारकासमूह प्राचीन शिल्पाकृतीतही आढळून येतात.ग्रीक कवी अरेटस याने इसवी सनापूर्वी २७५ मध्ये रचलेल्या “ द फेनामेना“ या काव्यात काही तारका समूहांच्या नावांचा उलेख आढळतो, तर इसवी सनापूर्वी १५० मध्ये "हिप्पार्कस” या ग्रीक खगोल शास्त्रज्ञाने तयार केलेल्या नकाशांमध्ये,ताऱ्यांची विभागणी व त्यांच्या तेजस्विते नुसार केलेली वर्गवारी ही आढळते.

हिप्पार्कसच्या नंतर हे काम अत्यंत शिस्तबद्धपणे केले ते ”टोलेमी” या दुसऱ्या ग्रीक तत्त्ववेत्याने.इसवी सनानंतरच्या दुसऱ्या शतकात १०२२  ताऱ्यांचा नकाशा तयार करण्याऱ्या टोलेमीने Almagest या आपल्या ग्रंथात या ताऱ्यांचे तेजस्विते प्रमाणे वर्गीकरण देखील केले.आणि त्याना १(जास्त तेजस्वी) ते ६ (कमी तेजस्वी) असे प्रत क्रमांक दिले.त्याची ही वर्गीकरण पद्धत आजही वापरली जाते.टोलेमीने ग्रीस मधून दिसणारे आकाश ४८ ताराकासमुहांमध्ये विभागले.पुढे जसजसे निरीक्षणाच्या पद्धती व साधने यांचे आधुनिकीकरण झाले तसतसे या नकाशातील ताराकासामुहांमध्ये भर पडत गेली. मात्र मूळ संकल्पना आजही तीच
आहे.

इ.स.१६०३ मध्ये योहान बायरने तयार केलेले आकाश नकाशे हे काहीसे आद्य मानता येतील.यानंतर अर्गेलेंदर, हेन्री ड्रेपर, येल वेधशाळा इत्यादींनी या नकाशांमध्ये आणि ताराकासमुहांमध्ये बरीच भर घातली. आजमितीस सर्व ८८ ताराकासमुहांचे अनेक नकाशे संगणकावर उपलब्ध आहेत.

तारका गोष्टी

ताराकासमुहांचे आकार, एकमेकांसापेक्ष स्थाने लक्षात ठेवण्यासाठी ग्रीक पुराणांतील वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला गेला. हीच संकल्पना भारतीयांनी देखील वापरली ज्यात आपल्याला भारतीय पुराण कथांचा वापर आढळतो. उदाहरणार्थ उत्तर आकाशातील शर्मिष्ठा (Cassiopeia) ,देवयानी (Andromeda),ययाती (Perseus) आणि वृषपर्वा (Cephus) हे तारकासमूह महाभारतातील एका कथेत गुंफल्याचे आपल्याला आढळते.


देवयानी ही दैत्यगुरु शुक्राचार्यांची कन्या, तर शर्मिष्ठा ही दैत्यराज वृषपर्व्याची कन्या. या दोघी घनिष्ट मैत्रिणी.एकदा त्या जल विहारासाठी गेल्या असताना जोराचे वादळ आले आणि घाई गडबडीत निघताना त्यांच्या वस्त्रांची अदलाबदल झाली. आपल्या वडिलांच्या पदरी नोकरी करणाऱ्या शुक्राचार्यांच्या कन्येने, देवयानीने, आपली वस्त्रे चढवली याचा राजकन्या शर्मिष्ठेलाला राग आला आणि देवयानीला विहिरीत ढकलून ती निघून गेली.या वेळी वनात शिकारीसाठी आलेल्या हस्तिनापुर नरेश ययातीने देवयानीच्या हाका ऐकल्या आणि तिला विहिरीबाहेर काढले.तिच्या सौन्दर्या वर भाळून त्याने तिला मागणीही घातली.

देवयानीने ही मागणी मान्य करतानाच, शर्मिष्ठेने आपली दासी बनून आपल्याबरोबर आले पाहिजे अशी अट आपल्या समोर मांडली. शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येच्या जोरावर राज्य उपभोगणाऱ्या दैत्यराज वृषपर्व्याला ही अट मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते.आपल्या पित्याचा व राज्याचा विचार करत शर्मिष्ठादेखील देवयानी बरोबर दासी म्हणून जाण्यास तयार झाली. हीच गोष्ट तारकासमूह लक्षात ठेवण्यासाठी वापरली आहे.

आकाशातील प्राणी सृष्टी

आकाशातील ८८ ताराकासमुहांमध्ये विविध जातकुळीतील प्राण्यांचे बरेच आकार कल्पिलेले आढळतात.उदाहरणार्थ सिंह (Leo) रास, लघु सिंह (Leo Minor), गवय(Lynx) हे मार्जार कुलीन प्राणी आहेत, तर ब्रहलुब्धक (Canis Major) ,लघुलुब्धक (Canis Minor) ,शामशबल (Canes Venatici) ही कुत्र्यांची जोडी हे श्वान कुलीन तारकासमूह आहेत.

घोडा हा आकाशातील कदाचित सर्वात जास्त स्थान व मान मिळवणारा प्राणी असावा. अश्वांचे हे सर्व प्रकार असामान्य व दैवी आहेत.यात पंख लावून उडणारा महाश्व (Pegasus) हा तर इंद्राचाच अश्व तर Equuleus हा अश्वमुख तारकासमूह. शृंगाश्व(Monoceros) हा एकशिंगी घोडा तर धनु रास तयार करणारा नरतुरग (Sagittarius) हा अर्धा मानव आणि अर्धा अश्व. मीन (Pisces) ,दक्षिण मत्स्य ,धनिष्ठा (Delphinus), तिमिन्गल(Cetus) ही समुद्री श्वापदे व मासे तर याच बरोबर आकाशात विहरणारे हंस (Cygnus) ,वृक्, शशक, सरठ (Lacerta)  असे पक्षी ,प्राणी व वासुकी(Hydra), भुजंग(Serpens) असे भितीप्रद सर्प देखील आहेत.यातील वासुकी हा आकाशातील मोठा तारकासमूह आहे. Andromeda  सारखी महाराणी ,कन्या (Virgo) राशीची नाजूक कन्यका,ओरायन हा शिकारी योद्धा,उत्तर मुकुट,ढल(Scutum), वजन मापे करण्यासाठी तुला,(Libra), दूरदर्शी (Telescopium), सुक्ष्मदर्शी (Microscopium), विहारासाठी नौका (Argo Navis) अशा अनेक परिचित गोष्टीनी ही प्रती सृष्टी नटलेली आहे. आगळ्या वेगळ्या विश्वामित्राच्या या प्रती सृष्टीतून फेरफटका मारताना आपणही खऱ्या अर्थाने विश्वामित्रच होऊन जाऊ यात शंकाच नाही.