मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

 Aditya L1


भारताने नुकतेच Aditya  L1 या  सौर मोहीमेचे प्रक्षेपण  २ सप्टेंबरला करीत असल्याची घोषणा केली.  आदित्य सुमारे १२५ दिवसांनी त्याच्या इच्छित स्थळी पोहोचणार आहे. हे इच्छित स्थळ म्हणजे त्याच्या नावातच असलेले  L1 म्हणजेच  लाग्रांज बिंदू १, जो पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किमी इतक्या अंतरावर आहे. तसं पाहायला गेलं तर सूर्य पृथ्वी सरासरी अंतर हे १४ कोटी ९५ लाख किमी इतकं प्रचंड आहे, त्यामानाने हे अंतर म्हणजे काहीच नाही. सूर्याचे पृष्ठभागांचे तापमान सुमारे ५५०० अंश इतके प्रचंड असल्याने सूर्याचे निरीक्षण करणारी याने त्याच्या जवळ जात नाहीत तर ती या लाग्रांज बिंदूपर्यंत पाठवली जातात. लाग्रांज बिंदू हे अवकाशातील असे बिंदू आहेत कि जिथे सूर्य - पृथी यांच्या गुरुत्वाकर्षणाचा समतोल साधला जातो व येथे पाठविलेल्या अवकाशास्थ वस्तू कोणत्याही ऊर्जेशिवाय स्थिर राहातात व तो बिंदू जसा सरकतो त्या वेगानेच भ्रमण करीत राहातात. अवकाशातील प्रत्येक गुरुत्वीय जोडगोळीला असे ५  बिंदू असतात. 



आदित्य वरील उपकरणे 

इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या (कोरोना) सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करण्यासाठी यान सात उपकरणे (पेलोड्स) घेऊन जाईल.

विशेष व्हॅंटेज पॉइंट L1 च्या मदतीने, चार उपकरणे थेट सूर्याकडे पाहू शकतील आणि उर्वरित तीन उपकरणे लॅग्रेंज पॉइंट L1 येथे कण आणि फील्डचा अभ्यास करतील . आदित्य L1 उपकरणांच्या या समूहातून सर्वात महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होईल. त्यांनी कोरोनल हीटिंग, कॉरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर ची निर्मितीप्रक्रिया आणि त्यांची वैशिष्ट्ये, अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कण आणि फील्डचा प्रसार इत्यादी समस्या समजून घेण्यासाठी माहिती प्रदान करणे अपेक्षित आहे.

मोहिमेची वैज्ञानिक उद्दिष्टे:

आदित्य-L1 मिशनची प्रमुख वैज्ञानिक उद्दिष्टे आहेत:

  • सौर वातावरणातील (क्रोमोस्फियर आणि कोरोना) डायनॅमिक्सचा अभ्यास.
  • क्रोमोस्फेरिक आणि कोरोनल हीटिंगचा अभ्यास, अंशतः आयनीकृत प्लाझ्माचे भौतिकशास्त्र, कोरोनल मास इजेक्शनची सुरुवात आणि फ्लेअर्स
  • सूर्यापासून कणांच्या गतिशीलतेच्या अभ्यासासाठी डेटा प्रदान करणारे कण आणि प्लाझ्मा वातावरणाचे निरीक्षण करणे .
  • सौर कोरोनाचे भौतिकशास्त्र.
  • कोरोनल आणि कोरोनल लूप प्लाझ्माचे निदान: तापमान, वेग आणि घनता.
  • कॉरोनच्या वस्तुमानाचे बाहेर फेकले जाणे, त्याची  गतिशीलता आणि कारणे.
  • अनेक स्तरांवर (क्रोमोस्फियर, बेस आणि विस्तारित कोरोना) घडणाऱ्या प्रक्रियांचा क्रम ओळखणे ज्यामुळे सौर उद्रेक घटना घडतात.
  • सौर कोरोनामध्ये चुंबकीय क्षेत्राची रचना आणि चुंबकीय क्षेत्र मोजमाप.
  • अंतराळ हवामानासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी (सौर वाऱ्याची उत्पत्ती, रचना आणि गतिशीलता इत्यादी).

भारताची ही पहिलीच सूर्य मोहीम असली तरी जपान, अमेरिका, चीन व काही युरोपियन मोहीम सूर्याचा अभ्यास पूर्वीपासून करीत आहेत. यातील L1 Point वर अजून कार्यरत असणाऱ्या काही मोहीम पुढीलप्रमाणे आहेत.  

  • सोलर आणि हेलिओस्फेरिक वेधशाळा (SOHO).
  • लिसाजस कक्षेतील प्रगत रचना एक्सप्लोरर (ACE).
  • WIND (2004 पासून L1 वर)
  • डीप स्पेस क्लायमेट ऑब्झर्व्हेटरी (DSCOVR)- 10 तरंगलांबी (EPIC) मध्ये सूर्यप्रकाशित पृथ्वीची प्रतिमा तयार करण्यासाठी आणि एकूण परावर्तित रेडिएशन (NISTAR) चे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले. 11 फेब्रुवारी 2015 रोजी प्रक्षेपित केले, सौर वारा आणि पृथ्वीवरील त्याचे परिणाम अभ्यासण्यासाठी 8 जून 2015 रोजी L1 भोवती फिरण्यास सुरुवात केली. 



गुरुवार, २५ मे, २०२३

प्राचीन चिनी खगोलशास्त्र

 प्राचीन चिनी खगोलशास्त्र 

प्रत्येक संस्कृतीला स्वतःचा ठेवा असतो.  भारतीय संस्कृतीला प्राचीन गणित आणीत खगोलशास्त्राचा ठेवा आहे तसेच रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यांचाही. खगोलशास्त्राच्या इतिहासात खगोलीय निरीक्षणे हा अमूल्य ठेवा मानला जातो. ग्रीक आणि भारतीय संस्कृतीतील ग्रंथांमध्ये ग्रहणे आणि  धूमकेतूची बरीच वर्णने आढळतात परंतु या सर्व वर्णनांहून महत्वाची ठरतात ती नेमकी खगोलीय निरीक्षणे व त्यांच्या बिनचूक नोंदी. या कोणत्याही खगोलीय उपकरणाच्या शिवायही केल्या गेल्या असतील. या सूर्य, चंद्र , ग्रह, उल्कावर्षाव, सूर्य व चंद्र ग्रहणे, अतिनवतारे यांच्या देखील असू शकतात. 

प्राचीन चिनी निरीक्षणांची पार्श्वभूमी

जगातील विविध संस्कृतींनी जरी आपली निरीक्षणे नोंदविलेली असली तरी चिनी निरीक्षणांचे वेगळेपण ठरते ते त्यातील अचूकता. बर्याचश्या खगोलीय घटनांचा नोंदी प्राचीन चिनी इतिहासलेखनात नोंदलेल्या आढळतात. यांचा मुख्य हेतू कदाचित भविष्य वर्तविण्याचा देखील असू शकतो. याचे कारण म्हणजे राजदरबारी या भविष्यवेत्त्यांना महत्वाचे स्थान असल्याचे आढळून येते. काही निरीक्षणे तर इ स पूर्व १३००, इतकी प्राचीन आहेत. पण या निरीक्षणांमध्ये अचूकतेचा अभाव आहे. ती एकतर घटनांची वर्णने अथवा चित्रे आहेत. इ. स. पूर्व ४८० ते ७२० या कालावधीतील घटना मात्र “च्यून्ग क्यू” नावाच्या चिनी ग्रंथाद्वारे नोंदलेल्या आहेत. यात सुमारे ३६ सूर्यग्रहणांचा उल्लेख आढळतो. ज्यात इ.स. पूर्व १७ जुलै ७०९ चे खग्रास सूर्यग्रहण देखील आहे, इ.स. पूर्व ६८७चा उल्कावर्षाव आहे, इ.स. पूर्व ६१३ च्या जुलै मधील धूमकेतू आहे, अशा काही महत्वाच्या नोंदी आहेत. 

 इ.स. पूर्व २२१-४८० हा आणखी एक ठळक कालखंड. हॅलेच्या धूमकेतूची सर्वात प्रथम नोंद इ.स.पूर्व २४० ची म्हणजे याच कालखंडातील. “शिजी” नावाच्या चिनी ग्रंथात हि नोंद आढळते. यानंतर अस्तित्वात आलेल्या विविध चिनी राजघराण्यांनी आपल्या पदरी खगोल-निरीक्षकांचीच नियुक्ती करून त्यांना दरबारात मनाचे स्थान दिले. आकाशात घडणारी कोणतीही महत्वाची खगोलीय घटना नोंदविणे हेच या खगोलशास्त्रज्ञांचे काम होते. अनेक पिढ्या चालत आलेल्या विविध राजघराण्यातील खगोल निरीक्षकांमुळे आज आपल्याला अनेक महत्वाच्या नोंदी सापडतात, तसेच ग्रहणाचे अचूक भाकीत न करता आल्यामुळे काही खगोल निरीक्षक प्राणाला मुकल्याची नोंदही आढळते. 

प्राचीन चिनी निरीक्षणांचा उपयोग

आज आपल्याकडे खगोल निरीक्षणाची अत्याधुनिक साधने उपलब्ध असल्याने आपल्याला सर्व खगोलीय घटनांचा नीट अभ्यास करणे शक्य होते. असे असताना केवळ डोळ्यांनी पाहिल्या गेलेल्या आणि ढोबळमानाने वर्णिलेल्या या खगोल निरीक्षणांचा उपयोग तरी काय ? असा प्रश्न आपल्या मनात उभे राहणे स्वाभाविक आहे. परंतु बरीच निर्णयांसाठी अशी निरीक्षणे उपयुक्त ठरतात असे आढळून आले आहे. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे एक अतिनवतारा अथवा एका ताऱ्याच्या मृत्यूमुळे त्याचा घडून आलेला स्फोट. 

क्रॅब तेजोमेघ
चिनी ग्रंथांमध्ये अनेकदा एखादा तारा प्रचंड प्रकाशमान झाल्याचे नोंदले आहे. अचानक प्रकाशमान होणाऱ्या आणि रात्रौ शुक्रापेक्षा तेजस्वी भासणाऱ्या ताऱ्यांच्या नोंदी इ.स. १८५, ३९३, १००६, १०५४, ११८१, १५७२ आणि १६०४ या वर्षांमध्ये केवळ चिनी निरीक्षकांनीच अचूकपणे नोंदविल्या आहेत. त्यांनी दिलेल्या स्थानांवरून आजच्या खगोलशास्त्रज्ञांनी या ठिकाणी असलेल्या ताऱ्यांचे अवशेष शोधून काढले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या स्पंदकांचे (PULSAR) निरीक्षण केले गेले. त्यांच्या स्फोटांचे वर्ष माहित असल्याने त्यांची सध्याची गती व वस्तुमान यावरून मृत्यूसमयी त्या ताऱ्याचे वस्तुमान काय असावे याचा आडाखा शास्त्रज्ञ बंधू शकले. या माहितीचा उपयोग विश्वरचना शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाना होतो, ज्यावरून ते सद्य स्थितीतील तारा त्याच्या आयुष्याच्या कोणत्या रेषेवर आहे त्याचे निदान बंधू शकतात. उदा. १०५४ साली पहिला गेलेला अतिनवतारा आता क्रॅब चा तेजोमेघ म्हणून परिचित असून तो वृषभ तारकासमूहात आढळून येतो. 

धूमकेतूची प्राचीन निरीक्षणे त्याच्या कक्षेचे अचूक निदान करण्यास उपयोगी ठरतात. तसेच या निरीक्षणांहून एखाद्या धूमकेतूचे वस्तुमान त्याकाळी किती असावे याचेही गणित मांडता येते. चिनी निरीक्षकांनी इ.स. १३६६ साली नोंदविलेला धूमकेतू म्हणजेच सध्याचा लिओनिड उल्कावर्षावाशी निगडित असणारा टेम्पल-टटल धूमकेतू होय. या आधी इ.स. ९०६ चा नोंदलेला लिओनिड उल्कावर्षाव देखील आपल्याला या निरीक्षणांत आढळतो. 

सूर्यग्रहणाच्या नोंदी 

सूर्यग्रहणाच्या नोंदींचा उपयोग आपल्याला दिवसाची लांबी ठरविण्यासाठी होऊ शकतो. उपग्रहांद्वारे केलेल्या निरीक्षणांद्वारे सूर्य आणि चंद्र यांच्या सामायिक बलामुळे दिवसाची लांबी प्रत्येक शतकात २. मिलिसेकंद इतकी वाढत असल्याचे गणित मांडले गेले. पृथ्वीपृष्ठावरील घडामोडींचा होणार विरोध यातील ०.५ मिलिसेकंद कमी करतो आणि परिणामी प्रतिशतक दिवसाची लांबी १.८ मिलिसेकंदाने वाढते. हान राजघराण्याने केलेली खग्रास सूर्यग्रहणाची नोंद इ.स. पूर्व ७०९ ची आहे. दर शतकात वाढत वाढत गेलेला प्रति दिवसाचा कालावधी अभ्यासाला तर या कालावधीत हा फरक गेल्या दोन सहस्रकांमध्ये  सुमारे  २ तासांचा पडतो. या आणि अशा अनेक इतर ग्रहण नोंदींचा अभ्यास करून दिवसाची लांबी शतकाला १.७ मिलिसेकंदाने वाढत असल्याचे अनुमान आपल्याला काढता येते. 

बेजिंग वेधशाळाचिनी निरीक्षकांनी जशी दृश्य निरीक्षणे केली तशीच ती सुलभ करण्यासाठी यंत्रे आणि वेधशाळांचीही उभारणी नंतरच्या काळात केली. प्राचीन भारतातील अनेक ग्रंथ नष्ट झाल्याने त्यातील ज्ञानही नष्ट झाले आणि जगाला त्याचा उपयोग होऊ शकला नाही. मात्र चिनी निरीक्षणाच्या बाबतीत असे घडले नाही. राजाश्रयाने वाढलेल्या खगोलशास्त्रीय ग्रंथसंपदेचे आणि इतर स्वरूपातील निरीक्षणांचे योग्य प्रकारे जातं झाल्यामुळे आणि त्यातील महत्व वेळीच जगापुढे आल्याने प्राचीन चिनी खगोल निरीक्षकांच्या नोंदींना आज महत्व प्राप्त झाले आहे.